तुळजापूर , दि. २१ :
शहरातील साळुंके गल्ली कासार गल्ली कवठेकर गल्ली कमान वेस चौक गल्ली भोसले गल्ली व शुक्रवार पेठ या वस्तीमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडण्यासाठी विभाग शंभर टक्के लसीकरण या मोहिमेअंतर्गत ही सुरुवात रामनवमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. भाजपाचे इंद्रजित साळुंखे, खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रसाद पाणपुडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल या युवक नेत्यांनी या मोहिमेची सुरुवात केली आहे.
विशेष नोंदी करीत ही मोहीम हाती घेतली आहे. लसीकरणामध्ये भाग घेणायाची नागरिकांना विनंती करून त्यांचे मन परिवर्तन करण्यात येत आहे. यादरम्यान घरामध्ये आजारी असणाऱ्या व्यक्तींची विशेष वेगळी नोंद करण्यात येत असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लसीकरणासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला असून नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता मतदानाची जनजागृती केल्याप्रमाणे लसीकरणाची जनजागृती करण्याची गरज भारतीय जनता युवा मोर्चा आणि आम्हा कार्यकर्त्यांना वाटले . त्यामुळे वरील विभागांमध्ये घरोघरी ही जनजागृती केली जात आहे अशी माहिती भाजपाचे इंद्रजित साळुंखे यांनी दिली.