लोहारा,दि.४: आब्बास शेख
 शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस अज्ञात मारेकऱ्यांनी धारधार शस्त्राने वार करून जागीच ठार केले आहे. ही घटना सालेगाव ता. लोहारा येथे शनिवारी दि.३ मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सालेगाव येथील शेतकरी गोविंद व्यंकट करदुरे वय ४२ वर्षे यांची सालेगाव शिवारात स्वतःची ४ एकर शेतजमीन आहे. सध्या रात्रीची थ्री फेस लाईट असल्याने मयत गोविंद हे नेहमीप्रमाणे आईसोबत कांद्याला पाणी देण्यासाठी शुक्रवारी (दि.२) रात्री ११ वाजता शेतात गेले होते. मध्यरात्री १२:३० वाजता लाईट आल्यावर गोविंद हे बोअरची मोटार चालू करून कांद्याला पाणी देत होते तर त्यांची आई रुक्मिणबाई ह्या जवळच झोपी गेल्या होत्या. गोविंद हे पाणी देत असलेल्या ठिकाणी एक विद्युत बल्ब सुरू होता. दरम्यान कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी या ठिकाणचा लाईट बल्ब काढून घेऊन अंधाराचा फायदा घेत पाणी देत असलेल्या मयत गोविंद यांच्या डोक्यात मध्यरात्री १२:३० ते ३ वाजण्याच्या सुमारास पाठीमागील उजव्या बाजूला कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने जब्बर वार करुन गंभीर जखमी करून जागीच ठार केले. 


यावेळी मयताची आई रुक्मिणबाई यांना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक जाग आल्याने त्यांनी उठून पाहिले असता त्यांचा मुलगा कांद्याला पाणी देत असलेल्या ठिकाणी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी आरडा ओरड करीत असता मुलाचा कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तात्काळ बोअरकडे जाऊन पाहिले असता यावेळी मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आला. 


यावेळी  त्यांच्या आईने हंबरडा फोडत आरडा ओरड केल्याने गावातील कांही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी या घटनेची लोहारा पोलोसांना माहिती दिली. असता सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, बिट अंमलदार डी. जी. पठाण,  गायकवाड,  कदम  सांगवे, यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन माकणी येथील प्रा.आ. केंद्रात पाठवून शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मयताची आई रुक्मिणबाई व्यंकटराव करदुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. मयताच्या पश्चात  आई, पत्नी, तीन मुले, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता शेतकरी पुत्राचा खून झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top