काटी ,दि.४:उमाजी गायकवाड
सर्वञ प्रशासनाच्या वतीने कोविड लसीकरण मोहीम उस्मानाबाद जिल्हाभर राबविण्यात येत असुन
काटी येथे मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून दोन वेळा मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे काटी ता. तुळजापूर येथील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत काटी गावात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी या गावची लोकसंख्या दहा हजारांहून आधिक असून येथे आरोग्य उपकेंद्र असून या आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यात आली आहे.
सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कडक उन्हाळा सुरु असुन त्यामुळे काटी येथील जेष्ठ नागरिकांना काटी पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागत आहे. परंतु सावरगावला जाताना येथील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सावरगावला येणे जाणेसाठी वेळेत एस.टी.ची सोय नाही व सध्या काटी ते टेलरनगर या नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या मार्गावर वाहतूकीची सोय नाही.
त्याचप्रमाणे कडक उन्हाचा व रांगेत उभे राहण्याचा येथील जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूकीची सोय नसल्याने अनेकजण कोरोना लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता असून येथील नागरिकांना व ज्येष्ठांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी काटी येथील नागरिकांसाठी जिल्हा आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने गावातच मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.