उस्मानाबाद,दि. ३०: 
ईश्वर निर्मित, निसर्गाप्रती मानवी वर्तन किती भयावह आहे,याचा साक्षात्कार आपण सध्या कोरोनाच्या महामारीतून अनुभवत आसुन येणाऱ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गावर मानवाने प्रेम करावे. असे मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरा  करण्यात आली. यावेळी डॉ.फड हे बोलत होते. 

     
 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. विजयकुमार फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. संजय तुबाकले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.वी.सावंत यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जात,धर्म, पंथ पासून कोसो दूर घनदाट जंगलात आपले जीवन व्यतीत केले. त्यांची वैचारिकता अत्यंत प्रभावशाली होती. ग्राम गीतेच्या माध्यमातून त्यांनी गाव विकासात संदर्भात अत्यंत मार्मिक लिखाण केलेली आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत उपाधी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. 


तुकडोजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ.फड म्हणाले, ईश्वर निर्मित निसर्गाने मानवाला भरभरून दिले,याउलट मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाचा ऱ्हास केला. सध्या आपण कोरोनाची महामारी अनुभवतो आहोत.कठीण प्रसंगातून आपण वाटचाल करत आहोत, यातून मानवाला सुधारण्याची संधी निसर्गाने दिलेली आहे. 

प्रचंड झालेली वृक्षतोड भरून काढण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, तेव्हा मानवाला जीवन जगण्यासाठी स्वच्छ प्रदूषण मुक्त निसर्ग आपणाला देईल. आणि हाच संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिला आहे असे डॉ.फड यांनी नमूद केले.


 यावेळी अर्थ विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती मैंदर्गिकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पिंपळे,सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी देशपांडे, वरिष्ठ सहाय्यक एफ.एस. वरिष्ठ सहाय्यक (भांडार) मधुकर कांबळे यांच्यासह निवडक अधिकारी ,कर्मचारी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
 
Top