चिवरी,दि.१५ : राजगुरु साखरे
 राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून शासनाने कोरोणाची साखळी तोडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
कोरोना महामारीचा  परिणाम अनेक व्यवसायात झालेला पाहायला मिळत आहे, याला शेती व्यवसाय देखील अपवाद नाही. शासनाने राज्यातील आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिल्याने तुळजापूर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढता रुग्णसंख्याचा मोठा परिणाम होत असल्याने बाहेरगावचे ग्राहक ही मंदावले आहेत. गल्लोगल्ली फिरून ही भाजीपाला विकला जात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 
परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात, आणि ते विक्री करण्यासाठी आपले हक्काचे जवळील आठवडी बाजाराचे ठिकाण गाठुन विक्री केली जाते.मात्र, प्रशासनाने  आठवडी बाजार बंद केल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला.
  पुन्हा भाजीपाला शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वांगे, कोथिंबीर, टमाटे,मेथी,पालक व इतर भाजीपाला पिक तोडणी अभावी शेतातच खराब होत आहे. त्याचबरोबर गल्लोगल्ली फिरूनही उत्पादन खर्चही निघणे अवघड झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यामुळे भाजीपाला उत्पादकातुन  नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
Top