उस्मानाबाद , दि.०१ :
जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणा-या विहिरीची कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत उस्मानाबाद जिल्हा परिषादेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा साठी ५९४ विहिरींना मंजुरी देण्यात आली असून सदर कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्यामुळे सदर कामांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्ह्यातील काही विहिरींना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
बऱ्याच प्रमाणात विहिरींची कामे पूर्णत्वास आली असली तरीही अनेक विहिरींची कामे अर्धवट असल्याने ते तातडीने पूर्ण करावीत. या विहिरीमुळे संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. जवळपास सर्वच विहिरी ह्या सिंचन तलाव, पाझर तलाव, नैसर्गिक पाणवठे आदींच्या जवळपास असल्याने विहिरींना चांगले पाणी लागत आहे.
कोणत्याही गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ नये. तसेच प्रत्येक गावांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टिकोनातून या सर्व सार्वजनिक विहिरींचे कामकाज तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे फड यांनी सांगितले.
फड यांनी तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यातील दौऱ्यात काही विहिरींच्या कामांची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतचा आढावा घेतला. फड यांच्यासोबत यावेळी त्या-त्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, गावचे ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.