काटी , दि.१२
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकरी माणिक लक्ष्मण गायकवाड वय ७१ वर्ष हे मंगळवार दि.११ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी विहिरीतुन पाणी काढत असताना त्यांचा पायरीवरुन तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यु झाला. मयत शेतकऱ्याचे पुतणे गणेश हरिदास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत शेतकरी माणिक गायकवाड यांच्या पश्चात, पत्नी, दोन भाऊ, पाच मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास बीट अंमलदार गोरोबा गाढवे हे करित आहेत.