नळदुर्ग, दि. ०४
शेतात रात्रीच्यावेळी बोअर मारत असताना पाऊस आल्याने ट्रकच्या पाठीमागे बसलेल्या एका शेतक-याचा चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्यची घटना सोमवार दि 3 मे रोजी मध्यरात्रीच्या वेळी लोहगाव ता. तुळजापूर शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसानी ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत घाटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, महादेव शेषराव जाधव,अदाजे वय ६५ वर्षे रा. येडोळा ता. तुळजापूर असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे.
यातील श्री देवीम पावर ड्रिलर्सचा ट्रक (क्र. टी.एन 34 एफ 6379) लोहगाव शिवारात सोमवारी सांयकाळी शेतात बोआर मारण्यासाठी नळदुर्गहुन आला. दरम्यान एक ते दोन बोअर मारल्यानंतर शहापुरे यांच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी बोअर मारत असताना शेजारी असलेले शेतकरी महादेव जाधव हे पाहण्यासाठी आले असता अचानक राञीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी महादेव जाधवसह काहीजण ट्रकच्या खाली बसले होते. त्यानंतर ट्रक पाठीमागे आल्याने डाव्या बाजुचे टायर अंगावर जावुन महादेव जाधव हे जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणा-यानी सांगितले.
या घटनेचा पोलिसानी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट ता.तुळजापूर येथे पाठविण्यात आले आहे. जाधव यांच्या मृत्यबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.