उस्मानाबाद,दि.२३: गणेश गायकवाड
 निसर्ग अन् कोरोनाच्या संकटालाही न घाबरता , राज्य सरकारकडून उत्पादित मालाला नेहमीप्रमाणेच हमीभाव न मिळताही आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजाने कंबर कसून खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती पूर्ण केल्या आहेत.


 दरम्यान, जगावर आलेल्या कोरोना संकटातही क्षणभराचा विसावा न घेता बळीराजा अहोरात्र शेतात राबतो आहे...बि-बियाणे, खतांची जुळवाजुळव करतो आहे.

दरम्यान, जगाचा पोशिंदा असलेल्या या घटकास राज्य सरकारने योग्य किंमतीत बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून द्यावीत अन् त्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव द्यावा, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.


गतवर्षीही कोरोनामुळे बळीराजाच्या उत्पादित मालाचे प्रचंड नुकसान झाले होते. 2020 ची खरिपातील पिके काढणीला आल्यावर परतीच्या पावसाने आकांडतांडव करून पिके आडवी केली आणि त्या नुकसानीतून बळीराजा सावरतो न सावरतो तोच त्याचीच पुनरावृत्ती वादळी वारे अन् अवकाळी पावसाने रब्बी हंगामातही केली होती. 



रब्बीत काढणीला आलेली पिके वाया जावू लागल्याने ऐन उन्हाळ्यात बळीराजा चांगलाच गारठून गेला होता. ऐन सुगीतच अवकाळी पाऊस, वादळी वार्‍यानेे रूबाबदार पिकांना गाठल्याने ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचीही मोठी हानी झाली होती. दरम्यान, पाऊस असून आणि नसूनही प्रत्येक साल निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरू लागल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांचा शेती व्यवसायावरील भरोसा उडू लागला असून, आता उत्पादित मालाच्या राशी घरी जातील अन् त्यास योग्य भाव मिळाला तरच शेतात पिकलं म्हणायचं... अशीच त्यांची मानसिकता झाली आहे.



गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर असतानाही जून महिन्यात मृगाचा पाऊस पडताच बळीराजाकडून वेळेत पेरण्या झाल्या आणि खरिपातील सोयाबीन, तूर, सुर्यफुल, बाजरी, मका आदी पिकेही जोमात आली होती. ही पिके हातातोंडाशी आल्यावर परतीच्या पावसाने निब्बर दणका देवून होत्याचं नव्हतं केलं. या अतिवृष्टीने अनेकांचे बांध-बंधारे वाहून गेले व त्यासोबत पिकेही वाहून गेली. यावेळी सत्ताधारी पुढार्‍यांसह विरोधी पक्षातील नेते, विविध संघटना पदाधिकार्‍यांनी शेताच्या बांधांवर जावून नुकसानीची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाकडून संबंध राज्यभरातील नुकसानीचे अहवाल शासन दरबारी गेले. यामुळे बळीराजाला शासनाकडून चांगली आर्थिक मदत मिळेल अशी आशा होती मात्र शासनाच्या तिजोरीतच खणखणाट असल्याने बळीराजाची गतवर्षी घोर निराशाच झाली आहे.
गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने ज्वारी, गहू, हरभरा आणि त्यांच्या संगतीला आंबा, द्राक्ष आदी बागाही साधतील अशी भोळी आशा शेतकर्‍यांना वाटत होती. 


चांगले आभाळ फिरल्याने ज्वारीचा कडबा परसाला (6 फुटाच्यावर) गेला आणि कणसंही टच्चून भरल्यानं सगळं काही आबादी-आबाद होत असतानाच अचानक वादळी वारे आणि अवकाळी पाऊस येवू लागल्याने शेतकर्‍यांचा जीव कासावीस झाला होता. दरम्यान, या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील काही भागात धिंगाणा घातला मात्र ज्या भागात या पावसाने हजेरी लावली नाही...त्या ठिकाणची रब्बीची सर्व पिके अनेक शेतकर्‍यांना साधली. यामुळेच यावर्षी ज्वारी अन् कडबा कमी दामात सर्वांना मिळतो आहे. 

यावर्षीही शासनाच्या भरोशावर न राहता बळीराजाने पुन्हा कंबर कसून, खरीप हंगामाची पेरणीपूर्व तयारी केली आहे. शेतात खते टाकणे, मुरमाड जमिनीवर काळी माती टाकून घेणे, नांगरणी, पणजी मारणे, कुळवाची पाळी घालणे आदी तयारी केली आहे. त्यातच औंदा पाऊसकाळ बर्‍यापैकी असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वारंवार येत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत...आता निसर्गराजाच्या हातातच बळीराजाचा भविष्यकाळ आहे.



खरिपासाठी 5 लाख 60 हजार 422 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून खरिपाचे 5 लाख 60 हजार 422 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली. दरम्यान, 9 भरारी पथकाद्वारे जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदाही जिल्ह्यात 3 लाख 74 हजार 600 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल आणि इतर क्षेत्रावर मका, उडीद, मुग, तूर आदी पिके बळीराजा घेईल असाही अंदाज कृषी विभागाने बांधला आहे.


खते, बियाणांचेही झाले नियोजन
जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून पेरणीसाठी लागणारी खते आणि बियाणांचे नियोजन केले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातून 56 हजार 750 क्विंटल बियाणे व खाजगी क्षेत्रातून 37 हजार 974 क्विंटल बियाणे असे एकूण 94 हजार 724 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तर जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचे 63 हजार 190 मे. टनाचे आवंटन मंजूर झाले आहे. जिल्ह्यात याचा सरासरी वापर 57 हजार 275 मे. टन असून, एप्रिल अखेरपर्यंत 30 हजार 148 मे. टन खते जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती घाटगे यांनी दिली.



ऑनलाईन प्रणालीचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना फटका ?

महाडीबीटी पोर्टल प्रणालीत अर्ज एक योजना अनेक ही सोय शासनाकडून अत्यंत चांगली केली आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट, सर्व्हर बंदच्या अडचणी निर्माण होत असल्याने या प्रणालीद्वारे सवलतीच्या दरात मिळणारे बि-बियाणे सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचेल की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. या योजनेद्वारे ऑनलाईनने शेतकर्‍यांना अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत आहे. या कालावधीत अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेद्वारे सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी ही बियाणे अनुदानावर मिळणार आहेत. मात्र सर्व्हरच्या अडचणीमुळे गरजू व अल्पभूधारक शेतकर्‍यांना याचा लाभ मिळतो की नाही? असा सवाल जाणकार शेतकर्‍यांतून उठत आहे. यामुळे 30 मे पर्यंत याची मुदत वाढवावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

 
Top