मुरूम, दि. 22 :
संसर्गजन्य कोरोना प्रादुर्भाव खेडया पाडयात व वस्तीवरही पोहचल्याने सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने सर्व व्ययसाय बंद आहेत.
या कालावधीत उपचार घेणा-या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर जावून कुठेही काही विकत घेता येत नाही. किंवा हॉटेलमध्ये जावून काही खाता येत नाही. ही समस्या ओळखून गरजवंताला अन्नदान करणे यासारखे पवित्र कार्य नाही. मात्र सध्या सर्वत्र भितीदायक वातावरण आहे. तरी देखील कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन, मुरूम ता. उमरगा येथील ग्रामीण रुग्णालय व विठ्ठलसाई साखर कारखाना येथील कोविड केअर सेंटर मध्ये जावून बालाजी गाडेकर व त्यांच्या पत्नी सविता या दोघांनी त्यांचा २३ वा वाढदिवस घरी साजरा न करता येथे केला.
ग्रामीण रुग्णालय, मुरूम व विठ्ठलसाई साखर कारखाना येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्ण व नातेवाईकांना एक वेळचे जेवण देवून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. घरी तर आपण दरवर्षी या-ना-त्या माध्यमातून वाढदिवस साजरा करतोच. पण यंदा या परिस्थितीत तो तिथे जावूनच त्यांच्यामध्ये साजरा करुया, हा निर्धार करून त्यांनी शुक्रवारी दि २१ मे रोजी रात्रीच्या वेळी शंभर व्यक्तींना पुरेशे भोजन दिले.
गाडेकर हे प्रारंभीपासून मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत माध्यामिक विज्ञान या विषयाचे सहशिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर अगदी तीन वर्षानंतर त्यांच्यावरती मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पडली, आणि त्यांनी ती गेल्या १५ वर्षापासून तत्परतेने पार पाडत आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने ही सेवा त्यांनी केली. ही उपक्रमशिलता त्यांना त्यांच्या पित्याकडून मिळाली असून त्यांचे वडील माजी सैनिक असल्याने कोरोना कालावधीत त्यांनी ही माणूसकी जोपासली हे निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.