तुळजापूर, दि. 21 : उमाजी गायकवाड

 तालुक्यातील  यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलातील माजी विद्यार्थी विनायक साळुंखे, नवनाथ जाधव,विवेक म्हेत्रे ,  मिलिटरी स्कूल नाशिक येथील त्याचे  वर्ग मित्र यांच्याकडून तुळजापूर येथील दुर्लक्षित बहुरुपी समाजातील सहा गरजू कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे गहू, तांदूळ,साखर,तूर डाळ, गोडेतेल, तिखट,जिरे मोहरी, मसाला असे एकूण जवळपास दिड हजार रुपयेचे किराणा साहित्याच्या किट वाटप केले.


तुळजापूर येथे शुक्रवार दि. 21 रोजी येथील पुजारी नगर कॉलिनीत नियमाचे पालन करुन यमगरवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अनिल धोत्रे ,धनंजय शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 
         

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा   सर्वाधिक फटका गोरगरीब झोपडीत राहणा-या तसेच बहुरुपी समाजातील  लोकांना बसला आहे. यात काही लोक मजुरी तर काही लोक भिक मागून आपली उपजीविका भागवत आहेत. 

 कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्यां गोरगरिबांचे सध्या हाल होत आहेत. एकलव्य विद्या प्रशालेतील विद्यार्थ्यांवर इतरांना मदत करण्याच्या संस्कारामुळे आपणही समाजाचे काही देणे आहोत, समाजातील दुर्लक्षित कुटूंबाच्या मदततीत आपलाही वाटा असावा या उदात्त हेतूने यमगरवाडी ता. तुळजापूर  येथील एकलव्य विद्या संकुलातील चार माजी विद्यार्थी   एकत्रित येऊन तुळजापूर कुलस्वामिनी सुतमील जवळ राहणाऱ्या दुर्लक्षित बहुरुपी समाजातील सहा गरीब कुटूंबियांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप  केले. 

 या मदतीमुळे या गरीब कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती.
   विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेऊन केलेल्या मदती बद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर,सचिव विवेक आयाचीत, अनिल घुगे तसेच कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 
यावेळी यमगरवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, सहशिक्षक अनिल धोत्रे, पत्रकार  उमाजी गायकवाड, आनिल आगलावे ,धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.
 
Top