औरंगाबाद,दि. ७
                                          विभागीयस्तरावरील लोकशाही दिन व विभागीय महिला लोकशाही दिनाचे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.14 जून, 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे.


तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित वेळेत नमुना प्रप्रत्र-1(क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्जही प्रप्रत्र-1(क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावे.
अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.


जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
तसेच राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्याकरीता शासन आदेशान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना अपवादात्मक परिस्थितीत उपस्थित रहावयाचे असल्यास त्यांना कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी मागील 48 तासात केलेल्या व निगेटिव्ह आलेल्या कोरोना RTPCR चा अहवाल/प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने अर्जदारांनी दि.14 जून 2021 रोजी विभागीय लोकशाही दिनास उपस्थित राहण्यासाठी मागील 48 तासात केलेल्या व निगेटिव्ह आलेल्या कोरोना RTPCR चा अहवाल/प्रमाणपत्र शाखा प्रमुख यांना सादर करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी, असे प्र.तहसिलदार (सामान्य प्रशासन्) विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी कळविले आहे.

 
Top