उस्मानाबाद,दि.७:
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वाहन चालक कक्षा सह दिव्यांग कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुंदर माझे कार्यालय, या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारती लगत पाठीमागच्या बाजूस कौलारू खोल्यांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकारी यांसाठी कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांसाठी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या परिसरातील अडगळ आणि निरुपयोगी जागेमध्ये बगीच्या उभारण्यात आला आहे. यामध्ये विविध फुलांची झाडे लावण्यात आलेले आहेत याची पाहणी मान्यवरांनी यावेळी केली.
उन्हाळा असो किंवा पावसाळा असो वाहन चालताना सदैव तत्पर राहावे लागते. त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निकोप राहावे याकरिता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतून वाहन चालका साठी विश्रांती कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती करिता देखील सर्व सोयींनीयुक्त कक्ष स्थापन केला आहे. वाहन चालकाचे आरोग्य बिघडले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो याकरिता त्यांची काळजी घेण्याबरोबरच दिव्यांगाचे देखील जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी महिला बालकल्याणच्या सभापती रत्नमाला टेकाळे, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.