जळकोट ,दि.२४
तुळजापूर तालुक्यातील मुर्टा - मानमोडी येथिल पाचपीरच्या उजाड डोंगरावर तब्बल पन्नास हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. वनीकरण विभाग, उस्मानाबाद जिल्हा परिषद व मुर्टा - मानमोडी ग्रामपंचायतच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उजाड माळरानावर, पडीक जमिनीवर, शेतबांधावर इतकेच काय गाव पातळीवरील घराच्या परस बागेत जेथे शक्य आहे तेथे प्रत्येक मानसी किमान तीन झाडाची रोपे म्हणजेच शासन निर्देशानुसार लोकसंख्येच्या तीनपट यानुसार विविध जातीची रोपे लावून त्यांचे जतन करण्याचे धोरण आहे.
जळकोट पासून अवघ्या ४ कि.मी. वर असलेल्या मुर्टा - मानमोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाचपीर या डोंगरावर अंदाजे चारशे एकर क्षेत्रावर तब्बल पन्नास हजार विविध जातीच्या रोपांची लागवड करण्याचा शुभारंभ जि. प. अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, पं. स. सभापती सौ. रेणुका इंगोले, जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, पं. स. गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, विस्तार अधिकारी के. बी. भांगे, विस्तार अधिकारी राऊत, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, सरपंच गोपाळ सुरवसे, सत्यवान सुरवसे, ग्रामसेवक प्रदीप शिंदे, जळकोटचे ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, निसर्गप्रेमी ,ग्रामस्थ उपस्थित होते.