दि.२२: राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यात मान्सून पूर्व व मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने पुढे पाऊस होईल या आशेवर शेतक-यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या, पण पेरणी केलेल्या कालावधीपासून पावसाने उघडीप दिल्याने तुडतुडे, मोर, हरीण असे वन्य जीव प्राणी पिकाची नासाडी करण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे याही वर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने व मृग नक्षत्रातही पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मिळेल, त्या भावात रासायनिक खत बियाणे खरेदी केल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पेरणीनंतर बियांची उगवण क्षमता ही चांगली झाली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने उगवलेल्या मका, सोयाबीन, उडीद, मूग ,तूर आदी पिकांना तुडतुडे, अळी शिंगा खुडत आहेत. त्यामुळे पिकांना सध्या पावसाची गरज आहे. परंतु सध्या दिवसभर जोराचा वारा सुटत असल्याने पाऊस लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता धास्तावला आहे.