तुळजापूर, दि. १८ :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मंदिरही भाविक- भक्तासाठी बंद करण्यात आले. मंदिर बंद झाल्याने मंदिरावर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांसह कुटूंबियांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली.
दरम्यान संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने परवानगी दिल्याने सर्व दुकाने उघडण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत मंदिर उघडण्याचा निर्णय झालेला नाही. त्याकरिता तातडीने मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा व्यवसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा तुळजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात पूढे म्हटले की, श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आर्थिक उलाढाल ही ९० टक्के मंदिर व भाविक भक्तावरच अवलंबून आहे. भाविक दर्शनासाठी आले तरच व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल होते. तुळजापूर तालुक्यात कुठलिही औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काम नाही. श्रीतुळजाभवानी मंदिरामुळे शहरासह तालुक्यातील मोठया प्रमाणावर तरुण विविध कामे करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असून सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून अत्यावश्यकसह सर्व दुकाने, सार्वजनिकसह खासगी वाहतुक सेवाही सुरु करण्यात आली आहे.
मात्र श्री तुळजाभवानी मंदिर अद्यापही भाविकांसाठी खुले झाले नाही. तर व्यवसायीक येत नसलयाने इतर दुकानातील साहित्याची विक्री होत नाही. त्यामुळे व्यापारी अर्थिक संकटात असून तात्काळ मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संजय बोंदर यांच्यासह व्यापाऱ्याची स्वाक्षरी आहे.
तुळजापूर तालुक्यात कुठलीही औद्योगिक वासाहात नाही, त्यामुळे तालुक्यात बेरोजगाराचा हाताला काम नाही. श्री.तुळजाभवानी मंदीरामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोशीत राहणाऱ्या पंचवीस ते तीस गावचे शेकडो तरुण तुळजापूरात काम करुन उदार निर्वाह करतात.