नळदुर्ग,दि.१८ :
पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग परिसरातील रस्त्यावर मोठया प्रमाणावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकासह दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता आपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. बस्थानक समोर, जुना जकात नाका जवळ, आपलं घर जवळ खड्डे पडलेले आहेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर व टोलनाका चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकासह प्रवाशांतून होत आहे.
या महामार्गवर होणाऱ्या अपघातामुळे अनेकना आपले जीव नाहकच गमवावे लागत आहे. याचा राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय रस्ता प्राधिकरण विभागाने गांभीर्याने विचार करून रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात गती आणावी अशी मागणी नळदुर्ग शहर व परिसरातील वाहनचालकांच्या वतीने करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर राष्ट्रीय रस्ता प्राधिकरणाच्या देखरेखीखाली मुंबई- हैदराबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.
मात्र रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेले काही ठेकेदार व पोट ठेकेदार अर्धवट काम करुन निघून गेल्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण आहे व सध्या संथगतीने सुरू आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 मुंबई- हैदराबाद रस्ता असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते.
त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठे व दुचाकी वाहने चालविणे अवघड झाले आहे. कारण दुचाकी चालविताना रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादात एकमेकांना धडकत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मृत्यू व गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीच्या वेळेस अंधाराचा अंदाज न आल्याने वाहने एकमेकांना धडकत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
यापूर्वी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिक तसेच विविध संघटनां च्यावतीने वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय रस्ता प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे गांभीर्याने न घेता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे केंद्र शासन खड्डेमुक्त रस्ते करण्याकरिता कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. मात्र त्याउलट संबंधित खात्याचे अधिकारी वागत असल्याने अनेकाना जीव गमवावे लागत आहे. त्यामुळे आणखी किती जणांचे जीव गेल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी जागे होणार ,असा संतप्त सवाल वाहनचालक व सर्व सामान्यातून उपस्थित केला जात आहे. व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग- जळकोट दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करून चौपदरीकरणाच्या कामाचा वेग वाढून तात्काळ रस्ता सुरू करावा अशी मागणी केली जात आहे.
संबधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मगणी
राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. महामार्गाचे काम पुर्ण नाही असे असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने नळदुर्ग जवळील फुलवाडी ता. तुळजापूर येथे टोलनाका सुरु केला आहे. वास्तविक पाहता महामार्गाचे काम पुर्ण करुन घेऊनच टोलनाका सरु करणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम पुर्ण झालेले नसताना हा टोलनाका सुरु करुन एकप्रकारे वाहन चालकांची लुटच सुरु केल्याचे बोलले जात आहे. आपघातात नाहकच प्राण गमवावे लागत असल्याने याप्रकरणी संबधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मगणी नागरिकातुन केली जात आहे.