तालुक्यातील तेर येथील तेरणा धरणातील मासेमारी करण्यासाठी परराज्यातील लोकांना मासेमारी करण्याचा परवाना देण्यात आला असून तो रद्द करण्यात यावा. तो परवाना तेर येथील कार्यक्षेत्रातील भूमिपुत्र असलेल्या मच्छीमारी करणाऱ्या लोकांना मासेमारीचा परवाना देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.२४ जूनपासून अमरण उपोषण सुरु केले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित गोवर्धनवाडी व तेरणा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित कोळेवाडी येथील या दोन संस्थेला शासनाने तलाव ठेका दिला असून संस्थेचे चेअरमन नंदू मारुती शिंदे हे २० वर्षापासून पुणे येथे राहतात. तर तेरणा मत्स्य व्यवसाय सह. संस्थेचे चेअरमन देवकन्या राजेंद्र राऊत या गेल्या १० वर्षापासून पंढरपूर येथे राहत आहेत. तसेच संस्थेचा पूर्ण कारभार त्यांचे नातेवाईक पाहतात. त्यामुळे या दोन्ही संस्थेच्या सचिवाकडे आम्ही मासेमारी परवान्यासाठी अर्ज केला असता दोन्ही संस्था अर्ज घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने आम्हा लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थेच्या नातेवाईकांनी आम्ही चोरून मासेमारी करतो, म्हणून खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
आम्हाला मासेमारी करण्यासाठी परवाना देण्यात यावा, यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय यांच्याकडे वारंवार विनंती अर्ज करून मागणी केली व करीत आहोत. परंतू त्यांनी आमच्या अर्जाची कसलीही दखल घेतली नसल्यामुळे तो परवाना देण्यात यावा, यासाठी दि.२४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहोत.
या उपोषणासाठी बालाजी हरिश्चंद्र माने, सचिन माणिक माने, अविनाश बालाजी माने, अमर विष्णू माने, सुरज सोमनाथ जाधव, तानाजी लिंबाजी माने, नंदू लिंबाजी माने, अभिषेक बालाजी माने, खंडू विश्वनाथ जामकर, बालाजी गोरख शिंदे, ब्रह्मचारी संदिपान खोत, काकासाहेब खोत व सागर सीताराम माने या मच्छीमार करणाऱ्यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.