लोहारा, दि.२३ : अब्बास शेख
विविध कोविड केअर सेंटरला तब्बल ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कमेसह अन्नधान्याचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर पेठसांगवी ता.उमरगा येथील युवा उद्योजक महेश देशमुख यांचे उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वञ आभिनंदन करुन कौतुक केले जात आहे.
सर्वञ कोरोना संसर्गमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. परिणामी राज्यासह देशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारून बाधित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत चालल्याने कोविड सेंटरवर ताण येत आहे. आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये साधनसुचितेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे प्रशासन हतबल होत असल्याचे चित्र आहे. अशा अणिबाणीच्या परिस्थितीत पेठसांगवी येथील महेश देशमुख हा तरूण उद्योजक आरोग्य विभागाच्या व बाधित रूग्णांच्या मदतीसाठी धावून आला आहे. देशमुख यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोविड सेंटरला मदत करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी साडेतीन लाख रूपयांची मदत केली आहे. यात पारणेर (जि.अहमदनगर) येथील निलेश लंके प्रतिष्ठान कोविड सेंटरला एक लाख रूपयांची आर्थिक मदत दिली. या शिवाय रूग्णांसाठी १० टन कोलम तांदूळ, ५० हजार अंडेही उपलब्ध करून देले. तसेच उमरगा येथील माऊली प्रतिष्ठान कोविड सेंटरलाही त्यांनी एक लाख रुपये तर ईदगाह कोविड सेंटरला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या त्यांच्या आर्थिक मदतीमुळे आरोग्य विभागाला बळकटी मिळात आहे. याचबरोबर देशमुख यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेठसांगवी येथेे विविध जातींच्या ३०० वृक्षांची लागवड करून झाडांचे संगोपण करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी माजी सरपंच सदानंद बिराजदार, पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तू राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे, माजी सरपंच राजेंद्र सुरवसे, गंगाराम माळी, संजय दलाल, सिद्धाप्पा महाजन, महादेव माळी, महादेव घोडके, ज्ञानराज देशमुख, विजयकुमार देशमुख, गोरख बनसोडे, दयानंद बनसोडे, रमेश पंचमहाल, मोहद्दीन शेख, अहमद तांबोळी, संतोष बिराजदार आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अशा काळात प्रशासनावर विसंबून राहाणे संयुक्तीक नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तिंनी पुढे येऊन प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. या सामाजिक जाणिवेतून मी माझ्या परीने कोविड सेंटरला मदत करीत आहे. पुढेही मदत करण्या प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
महेश देशमुख, युवा उद्योजक, पेठसांगवी