तुळजापूर, दि. ३: डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारच्या वतीने नव्याने गठीत केले असून आयोगाच्या सदस्यपदी तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गोविंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रामधून डॉ. काळे यांचे अभिनंदन होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाचे कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारण आणि न्याय प्रक्रियेतील तज्ञ सदस्यांची निवड केली. यामध्ये आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुळे यांची नियुक्ती झाली आहे.
मराठवाड्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेचे अध्यक्ष असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्ये गेल्या २० वर्षापासून विविध पदावर कामाचा अनुभव असणारे, व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेट-सेट प्रश्नासंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदीर्घकाळ न्यायालयीन लढाई लढणारे,अभ्यासू सिनेट सदस्य गोविंद काळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या आयोगाच्या सदस्यपदी प्राचार्य बबनराव तायवाडे निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मिश्रा, ॲड. बालाजी किल्लारीकर, डॉ. संजीव सोनवणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. नीलिमा सराफ, श्रीमती अलका दगडू राठोड, ॲड. लक्ष्मण खाटीक या सदस्यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या मराठवाडा शिक्षक सेनेचे अध्यक्ष गोविंद काळे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यापीठातील प्राध्यापक, शिवसेनेतील नेतेमंडळी, विज्ञान आणि शिक्षणतज्ञ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.