नाईलाजाने जास्त भावाची बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांना नामुष्की - शिवाजीराव गायकवाड
तुळजापूर, दि. ८ ;डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्र कडून मागणी करण्यात आली तेवढा महाबीज बियाणांचा पुरवठा न झाल्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना जास्त भावाचे इतर कंपन्यांची बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. अजून पुढील तीन दिवसात महाबीज बियाणे उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी दिला आहे.
तुळजापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रा कडून अधिक बियाणांची मागणी करून देखील केवळ पाचशे एक क्विंटल महाबीज बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले आहेत , त्यामुळे इतर कंपन्यांचे जास्तीच्या भावाचे बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या विषयाच्या अनुषंगाने शेतकऱ्याची नेते व तुळजापूर पं. स. माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पुढील तीन दिवसाचा बियाणे उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कृषी खात्याकडून १ मे २०२१ पर्यंत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना कृषी सेवा केंद्राची अधिक बियाणांची मागणी असताना तालुक्यातील तुळजापूर येथील १ , जळकोट येथील २ ,काटी येथील १ आणि इटकळ येथील १ कृषी सेवा केंद्रांना एकूण ५०१ क्विंटत महाबीज बियाणांचा पुरवठा करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यात कृषी सेवा केंद्रांना शेतकऱ्यांना परवडणारे ( २३४०रुपये क्विंटल ) महाबीज बियाणे झाल्यामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत . त्यामुळे बाजारामध्ये ग्रीन गोल्ड इंदोर, ग्रीन गोल्ड औरंगाबाद , रायझिंग सन , बंसल सीड्स, यशोदा सीड्स, हरितक्रांती सीड्स, सिद्धार्थ सिड्स आणि इतर कंपनीचे जास्त भावाचे बियाणे खरेदी करण्याची नामुष्की पत्करावी लागली. याचा आर्थिक फटका गोरगरीब आणि अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला बसलेला आहे.
अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीनुसार महाबीज व्यवस्थापनाकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी ५४ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १२ हजार क्विंटल महाबीज बियाणे उस्मानाबाद जिल्ह्याला उपलब्ध झाले . त्यातील केवळ ५०१ क्विंटल तुळजापूर तालुक्याच्या वाट्याला आली आहे.
महाबीज बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण विचारणा करू आणि तुळजापूर तालुक्याला येणाऱ्या चार दिवसात महाबीज बियाणे मिळवण्यासाठी मागणी करू असे गायकवाड यानी सांगितले . बियाणे उपलब्ध न झाल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.