उस्मानाबाद, दि.२८ :
ग्रामपंचायत सदस्याने तक्रारी देऊन शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. तर महिला सरपंचांना मानसिक त्रास देण्याबरोबरच त्यांची मानहानी केली आहे. त्यामुळे त्या सदस्यावर फसवणूकचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी उपसरपंचासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विस्ताराधिकारी व गट विकास अधिकारी यांनी स्वतंत्र दोन चौकशा केल्या आहेत. मात्र त्या चौकशी अहवालात या तक्रारीत काहीही सत्यता नसल्याने यामध्ये काही निष्पन्न होत नसल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
भूम तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच विद्या बालाजी शिर्के यांच्यासह इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या शासन परीपत्रकानुसार ग्रामसभा घेण्यात आली. तर दि.२ मार्च रोजी मासिक बैठक घेतली. या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या देखील केलेल्या आहेत. तसेच दि.२६ मार्च रोजी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) गावस्तरीय समितीची निवड करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. या सह्यामध्ये तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वारे यांचा देखील समावेश आहे. मात्र ग्रामपंचायत सदस्य वारे यांनी याबाबत खोटी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केल्याचा आरोप केले आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली. परंतू चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसल्यामुळे त्यांनी गट विकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दि. २१ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कळंब येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी चौकशी केली, त्या चौकशीत देखील काहीही निष्पन्न झाले नाही. असे असताना देखील ग्रामपंचायत सदस्य वारे यांनी खोट्या तक्रारी करून सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांची बदनामी करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्ते यानी सांगुन पुढे म्हटले आहे की, ग्रामसभेबाबत खोटी तक्रार देऊन शासनाची फसवणूक व दिशाभूल करण्याबरोबरच सरपंचांना मानसिक त्रास देऊन त्यांची नाहक मानहानीचे कटकारस्थान करीत असल्यामुळे ग्रा.प. सदस्य तात्यासाहेब वारे यांच्यावर गुन्हा नोंद होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
यासाठी उपसरपंच औदुंबर वारे, शिवलिंग शिर्के व सोमनाथ वारे या ग्रामस्थांचा समावेश आहे.