लोहारा,दि.१६: 
 तालुक्यातील मोघा (बु.) येथील   लोहारा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव वामनराव सूर्यवंशी (80) यांचे  मंगळवार रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. 

लोहारा हायस्कूलचे तरुण वयात मुख्याध्यापक झाल्यानंतर उत्तमराव सूर्यवंशी यांनी हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख चढत्या क्रमाने कायम ठेवला. एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते अनेक वर्षे कोषाध्यक्ष होते, त्यांच्याच कार्यकाळात अध्यक्ष एम. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संघाची भव्य ईमारत उस्मानाबाद येथे उभारली गेली आहे. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यांनी गोर गरीबांच्या अनेक मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन त्यांना उच्च पदापर्यंत पोहचविले. साधी राहणी, उच्च विचारश्रेणी या तत्वाचा अंगिकार करत वाटचाल करणा-यांत  उत्तमराव सूर्यवंशी अग्रेसर होते, 

 अलीकडे त्यांची तब्येत बिघडली होती. मुत्राशयाचा आजार झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र वय झाल्याने औषधोपचाराला शरिराने साथ दिली नाही, त्यातच त्यांची प्राणज्योत  मालवली.  त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,  मुलगा , मुलगी , सून , नात, नातवंडे असा परिवार आहे. 
 
Top