पेरणीचा प्रश्न ऐरणीवर असताना शेतकऱ्यांना मोठा फटका.
किलज,दि.४ :
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.२ जून रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास वादळाच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे.जवळपास अडीच ते तीन तास हा पाऊस सुरू होता.या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे.
एककिडे कोरोनाचा काळ चालू असताना यामध्ये पेरणीचा प्रश्न हा ऐरणीवर असून त्याकरिता लागणारा हा पैसा शेतकरी वर्गाकडे पुरेसा नसून उसने पैसे काढून त्या माध्यमातून शेतकरी बी-बियाणे याच्या मागे लागला आहे. तर दुसरीकडे या अवकाळी चक्री वादळाच्या पावसाने शेतकरी वर्गासमोर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. यामध्ये अनेकांच्या शेतातील माती ही पावसाच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेली आहे.तर अनेक फळ झाडे ही तुटून पडली आहेत. अतिप्रवाहामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी आता हताश झाला आहे. सध्या अनेक शेतकरी हे सर्वत्र बी-बियाणे कसे मिळतील याच्या मागे लागले आहेत. तर ओढवलेल्या नैसर्गिक फटक्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे.
यापूर्वी मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरीसह गावातील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. यापूर्वी झालेल्या पावसाने गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तर आता झालेल्या या पावसाने शेतकरी वर्गाचे शेतातील मोठे नुकसान झाले आहे. सध्या वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरी भागात आपला संसाराचा गाडा चालवणारा तरुण वर्गानी सुद्धा आपले गाव धरली आहेत. यामध्ये या तरुणांनी आपली परंपरा अर्थात शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
अशा प्रकारच्या अडचणी येत असल्याने तरुण वर्ग सुध्दा नाराजी व्यक्त करत आहे.या पावसामध्ये गावातील अनेक लोक हे कोरोनाच्या धास्तीने शेतात जाऊन राहिले आहेत, तर अश्यांना सुद्धा या पावसाचा मोठा फटका बसला आहे. किलज येथे मुसळधार पावसाने झालेल्या शेतीतील नुकसान शेतकरी यांची फक्त कागदापुरते मर्यादित पंचनामे न होता , अंमलबजावणी व्हावी अशी मागणी इथल्या शेतक-यांनी केली आहे.