जळकोट,दि.४ :
सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांनी  हराळी (ता.लोहारा) गावातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षी फुटलेल्या बांधबंदिस्ती व ओढा रुंदीकरणाचे काम करण्यासाठी मोफत जेसीबी उपलब्ध करून दिली आहे. या कामासाठी शेतकरी डिझेलची व्यवस्था करीत आहेत. 


 सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी यांच्या मोफत जेसीबी मार्फत हराळी व परिसरात जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सध्याच्या पर्जन्यमानाची अनियमितता व अनिश्चितता या कारणांमुळे कमी वेळेत जास्त तीव्रतेचा पाऊस पडत आहे. त्यामुळे बांध फुटून शेतातुन पाणी वाहून जात आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.   या कारणांमुळे शेतीची सुधारणा होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात मागील कांही वर्षांपासून या विषयी जागृत करण्याचे काम लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. यामुळे स्वच्छेने शेतकरी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. याची परिसरात माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. जेसीबी मोफत दिल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून  सचिन सुर्यवंशी यांचे कौतुक करण्यात येत आहे. 


कोविड-१९ सारख्या महामारीत सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी काहीतरी देणे आहे. हे ओळखून सूर्यवंशी यांनी हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या अडचणीला धावून गेल्याने शेतकऱ्यांना या कामातून धीर मिळत आहे.
 
Top