उस्मानाबाद, दि. 25 : 

आजपर्यंत कोरोनावर अद्यापही रामबाण औषध निघालेले नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लस हीच कोरोना थोपविण्यासाठी एकमेव प्रभावी माध्यम आहे. त्यात ही “लस” प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कोरोना लस मिळणे सर्वांचाच मूलभूत अधिकार आहे, ही लस सर्व नागरिकांना मिळावी म्हणून प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. 


स्वाधार मतीमंद मुलींचे वसतीगृह आळणी व वरुडा येथील पारधी वस्ती येथे विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. लसीकरणा दरम्यान जिल्हाधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. मागील तीन चार महिन्यापासून लसीकरणासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यात बहुतांशी यशही मिळत आहे. पण आजही गावातील काही घटक, तांडे, वस्त्या, निराधारांचे समूह, दिव्यांग, स्थलांतरीत समूह इत्यादी या प्रवाहापासून दूर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा घटकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 


स्वाधार मतीमंद मुलींचे वस्तीगृह येथे जावून 18 वर्षावरील मुलींचे लसीकरण करण्यात आले. तर वरुडा पारधी वस्ती वरील लोकांचे तिथेच लसीकरण करुन लोकांना संरक्षित करण्यात आले. या दोन्ही सत्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी, ढोकी यांच्या पथकामार्फत लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. के.के. मिटकरी, तहसीलदार श्री.गणेश माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. क्षिरसागर, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. बिरादार आदी कर्मचारी उपस्थित होते.
 
Top