तुळजापूर, दि. २३ :डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर येथील श्री  तुळजाभवानी मंदिरासमोर तुळजापूर विकास प्राधिकरण मधून बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पायऱ्या काढून टाकून तेथे सरळ रस्ता बनवण्यात यावा अशी महत्त्वाची मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुनिल  रोचकरी यांनी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना दोन वेगवेगळ्या निवेदनाद्वारे तुळजापूर शहराच्या दोन प्रमुख प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.  नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये या दोन  विषयाची मंजुरी घेऊन यासंदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

तुळजापूर विकास प्राधिकरण मधून भवानी मंदिरासमोर महाद्वार परिसर व शुक्रवार पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगडी पाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पाण्याचा कोणताही चांगला उपयोग होताना दिसत नाही. त्या मोडकळीस आले असून या भागातील सर्व नागरिकांची मागणी नुसार येथे सरळ सर्वसाधारण रस्ता करण्यात यावा ,  यासाठी आपण गेल्या ३ वर्षापासून प्रयत्नशील आहोत. यापूर्वी नगरपरिषदेने हा प्रश्न प्राधिकरण आमचा असल्यामुळे त्यासंदर्भात प्राधिकरणाकडे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या होत्या,  मात्र त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी एकाच कामासाठी दोन वेळा पैसा खर्च करणे शासनाच्या धोरणामध्ये बसत नसल्यामुळे सदर कामासाठी जिल्हा नियोजन मंडळ अथवा नगरपरिषद निधी याचा उपयोग करण्याची  सूचना दिली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष रोचकरी यांनी सदर कामासाठी येणाऱ्या बैठकीत विषय मंजूर करावा अशी मागणी केलेली आहे. 


याशिवाय येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या प्रशाला ही इमारत नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी व या अनुषंगाने सदर बैठकीत विषय मंजूर करावा अशी मागणी नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी केली आहे.
 
Top