तामलवाडी दि . ३० 
 तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावास एक ठरावीक महसुली सज्जा नसल्याने येथील शेतकरी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या खरिप हंगामाचे पिक कर्ज वाटप सुरू असतानाही येथील शेतकऱ्यांना पिक कर्जापासून वंचित रहावे लागत आहे. 


वारंवार बँकाकडे खेटे मारुनही पिक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त केला जात आहे. पांगरदरवाडी या गावाचे क्षेत्र सांगवी (काटी), दहिवडी, मसला खुर्द, सावरगाव, माळुंब्रा या पाच महसुली सज्जामध्ये क्षेत्र विभागले आहे. या सज्जाला महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आदि बँका दत्तक आहेत. पांगरदरवाडी या गावचा संपुर्ण आर्थिक व्यवहार हा महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा सांगवी (काटी) या शाखेतुन चालतो. या बहुतांश गावातील सर्वच बचत खाती या बँकेत आहेत. असे असताना बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सज्जा असल्याचे कारण देत दहिवडी, मसला खुर्द, सावरगाव या महसुली सज्जात जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना पिककर्ज मिळणे कठिण झाले आहे. 

पांगरदरवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या सांगवी (काटी) या शाखेतुन पिक कर्ज मिळावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी जिल्हा अगृनी बँकेकडे केली आहे.

विजय निंबाळकर, सरपंच पांगरदरवाडी
आमचा गावचा सर्व व्यवहार हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या या बँकेत ठेवी आहेत. असे असताना येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळेनासे झाले आहे. हे दुदैव आहे. आम्ही जिल्हा अगृनी बँकेकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत.

बालाजी शिंदे, शेतकरी पांगरदरवाडी

अनेक दिवसांपासून आम्ही पिककर्जासाठी बँकेकडे जात आहोत. मात्र, आम्हाला पिककर्ज दिले जात नाही. आमच्या गावाजवळ असलेल्या सांगवी काटी बँकेतुन आम्हाला कर्ज पुरवठा व्हावा. 
 
 
Top