उस्मानाबाद , दि .२६ :
सर्व समाजाला समान संधी मिळायला हवी , हे छत्रपती शाहू महाराज यांनी जाणले आणि आरक्षणाची व्यवस्था केली. सध्याच्या राज्यशासनाने जे आरक्षण अस्तित्वात होते ते देखील टिकवले नाही. आरक्षण गमावणे हे राज्य सरकारचे अपयश आहे असे मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अध्यक्षा अस्मिता कांबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जोपर्यंत शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत समाज प्रगती करू शकणार नाही हे जाणले होते. याकरिता त्यांनी शिक्षणाची सोय केली. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांचे मत होते.सध्याच्या राज्यशासनाने जे आरक्षण अस्तित्वात होते. ते देखील टिकवले नाही.आरक्षण गमावणे हे राज्य सरकारचे अपयश आहे असे मत अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी बी.आर.हजारे, शिक्षण विस्तार अधिकारी येरमुनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद प्रयाग,समाज कल्याण चे निरीक्षक शिंदे,आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी एल.जी.गिरी,अर्थ विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी प्रमोद पडवळ, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक पटेल यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.