तुळजापूर, दि. १६ :
देशभरातील जैन समाजाच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञ आणि जैन धर्म साहित्याचे गाढे अभ्यासक तुळजापूर येथील डॉ. हर्षवर्धन मेहता यांचा शुल्लक दीक्षाविधी विधीवत परंपरागत पद्धतीने करण्यात आला.
तीर्थराज सम्मेद शिखरजी या झारखंड येथील प्रसिद्ध तेथील तीर्थक्षेत्रांमध्ये अध्यात्मिक गुरु विशुद्ध सागर जी महाराज यांच्या शुभहस्ते हा मंगलमय कार्यक्रम संपन्न झाला.
तुळजापूर येथील मेहता हॉस्पिटल मध्ये गेली ४२ वर्ष तुळजापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा दिल्यानंतर डॉ. हर्षवर्धन मेहता यांनी १६ वर्षापुर्वी सप्तम प्रति माघारी व्रत घेऊन धर्मचिंतन आणि लोकांना मार्गदर्शन करीत आहेत.
सुरुवातीपासून डॉ. हर्षवर्धन हे जैन धर्म आणि साहित्य याचे अभ्यासक राहिलेले आहेत . या अभ्यासातील चिंतनातून त्यांनी सप्तम प्रतिमाघारी व्रत अंगीकारून संपूर्ण आयुष्य धर्मकार्यासाठी वाहून दिले. धर्मकार्यासाठी मोठा त्याग करत त्यांनी तुळजापूर येथील जैन समाजाला खूप मोठा सन्मान मिळवून दिला आहे. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मेहता यांना देशभरातील जैन बांधव आदराचे स्थान देऊन आहेत.
मेहता कुटुंबामध्ये डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्री यांनी कूंतलगिरि येथे अर्थिका व्रत स्वीकार करून समाधी मरण स्वीकारले, त्यांचे लहान बंधू व्रजकुमार मेहता यांनीही सप्तम प्रतिमाघारी व्रत घेतलेले असून त्यांचे धर्म चिंतन सुरू आहे. मेहता यांचे दोन चिरंजीव डॉक्टर असून तुळजापूर येथे डॉक्टर आनंद मेहता हे बाल रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत व आदर्श मेहता हे सोलापूर येथे अस्थिरोग तज्ञ म्हणून लोकांची सेवा करीत आहेत.
तुळजापूर येथील जैन पार्श्वनाथ मंदिर आणि सावरगाव येथील दिगंबर जैन मंदिर येथे डॉ. हर्षवर्धन मेहता यांनी प्रदीर्घ काळ धर्मचिंतन सेवा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथील मंदिराचा जीर्णोद्धार तसेच सभामंडप आणि इतर भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. सावरगाव हे अतिशय तीर्थक्षेत्र म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या सावरगाव येथे दर्शनासाठी वर्षभर असते.
झारखंड येथील तीर्थराज सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्रांमध्ये तुळजापूर येथील मेहता यांच्यावर विशुद्ध सागरजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या शिल्लक दीक्षाविधीच्या निमित्ताने तुळजापूर शहराला आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठा नावलौकिक मिळाला आहे . यानिमित्ताने तुळजापूर येथील जैन समाजातील नागरिक व तुळजापूर शहरवासीयांनी मेहता यांच्या या धार्मिक विधी सोहळ्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.