तुळजापूर, दि. २३ : डॉ. सतीश महामुनी
कोरोना आपत्तीमध्ये मागील दीड वर्षापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्यामुळे पुजारी बांधवांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने ४५० पुजारी कुटुंबांना अन्नधान्याचे तिकीट आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. खूप मोठ्या प्रमाणावर संकट असल्यामुळे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने केलेली ही मदत अमुल्य आहे अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुजारी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे यांच्या हस्ते पुजारी बांधवांना कीट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार पाटील, नगराध्यक्ष रोचकरी यांच्याकडे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासह पुजारी बांधवाच्या समस्या मांडण्यात आल्या.
यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, नगरसेवक चंद्रकांत कणे यांच्यासह नागेश साळुंके, अविनाश गंगणे, नरेश अमृतराव, शिवाजी बोधले, विकास खपले, शांताराम पेंदे, सुधीर रोचकरी, सुजय हंगरगेकर, संभाजी भांजी आदी पुजारी मंडळाच्या संचालकांची उपस्थिती होती.
मागील दीड वर्षापासून तुळजाभवानी पुजारी मंडळ सातत्याने पुजाऱ्यांना सहकार्य करीत आहे. यापूर्वी १२०० कीट वितरित केले होते, मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे आणि विपीन शिंदे यांच्यासह इतर संचालक सातत्याने या अडचणीच्या काळात पुजारी बांधवांना सहकार्य करण्याचे प्रयत्न करीत आहेत, संपूर्ण तुळजापूर शहर मंदिर बंद असल्यामुळे खूप मोठ्या अडचणींमधून वाटचाल करीत आहे ,पुजारी मंडळांनी सहकार्याचा दिलेला हात अमूल्य असल्याची भावना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी अनौपचारिक बोलताना व्यक्त केली.