उस्मानाबाद ,दि.२१
पोलीस मुख्यालय: आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्यासाठी सध्या देशभरात 100, 101, 102, 108, 1098 असे विविध हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक अस्तित्वात असल्याने संभ्रम निर्माण होतो. या कारणास्तव भारत सरकारने ‘डायल 112’ हा उपक्रम देशभरात फेब्रुवारी 2020 पासून अंमलात आणला असून त्या अंतर्गत वरील विविध हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक विलीन करण्यात येणार आहेत.
त्यानंतर आपत्कालीन मदतीकरीता संपुर्ण देशभरासाठी 112 हा एकमेव हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक राहनार आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यात लवकरच होणार असुन त्या करीता जिल्हा पोलीस मुख्यालयात जीपीएस ट्रॅकर व कॉल ट्रॅकर सुविधा असलेला नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे.
डायल 112 या प्रस्तावित उपक्रमासाठी उस्मानाबाद पोलीस दलास शासनाकडुन 8 एसयुव्ही कार प्राप्त झाल्या आहेत. तसेच पोलीस ठाणे हद्दीत 24 × 7 मोटारसायकल बीट मार्शल गस्त घालण्याकरीता ‘जिल्हा नियोजन व विकास समिती’ मार्फत 76 मोटारसायकल व 5 एसयुव्ही कार प्राप्त झाल्या आहेत. या 5 एसयुव्ही कारपैकी 3 कार या महिला सुरक्षा विषयक गस्त घालणाऱ्या गुलाबी पथकास (पिंक पेट्रोलींग) तर उर्वरीत 2 कार या बीट मार्शल पथकास देण्यात येणार आहेत.
वरील प्रकारे प्राप्त झालेल्या एकुण 76 मोटारसायकल व 13 एसयुव्ही कारचा लोकार्पण सोहळा आज दि. 21 जून रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर संपन्न होउन उस्मानाबाद शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या लोकार्पण सोहळा प्रसंगी पालकमंत्र्यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हि वाहन रॅली पोलीस मुख्यालय- छत्रपती शिवाजी महाराज चौक- डॉ. आंबेडकर चौक- समता वसाहत मार्गे फिरुन पोलीस मुख्यालयात विसर्जीत झाली.
या कार्यक्रमास लोकसभा सदस्य- ओमराजे निंबाळकर, मा. विधानसभा सदस्य- कैलास घाडगे पाटील, श्री. ज्ञानराज चौगुले, मा. विधानपरिषद सदस्य- श्री. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष- श्रीमती अस्मिता कांबळे यांसह मा. जिल्हाधिकारी- श्री. कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी- श्री. विजयकुमार फड यांसह उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.