तुळजापूर  दि . ३० 

श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर असणाऱ्या दगडी पायर्‍या काढण्यात याव्यात आणि तेथे सरळ रस्ता करण्यात यावा अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे नगरसेवक रोचकरी यांचे हे चौथे निवेदन महाद्वार समोर जिल्हाधिकारी यांचा दौरा असताना देण्यात आले आहे.


तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या कामामधून तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात दगडी पायर्‍या बांधण्यात आले आहेत. तत्कालीन प्रस्तावामध्ये महाद्वार परिसराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या दगडी पायऱ्या करण्यात आले आहेत. परंतु या दगडी पायऱ्या झाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे साहित्य आणि मोटार सायकल उभ्या करण्यात येत आहेत. यामुळे खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक दगडी पायऱ्या निघाल्या आहेत. 

खडकाळ गल्ली व परिसरात राहणाऱ्या लोकांना ही मोठी अडचण झाली असल्यामुळे नागरिकांनी व या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी या दगडी पायऱ्या काढण्याची मागणी केली आहे. तेथे सामान्य रस्ता करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे .


या निवेदनावर अंबादास कदम, दिवाकर शेळके, रमेश अमृतराव,  शेषकुमार रोचकरी, आकाश अमृतराव, शिवाजी अमृतराव, लखन शिंदे, सचिन माने, विकास सोनजी, प्रशांत शिरसागर, महेश अमृतराव ,नरसिंग साळुंखे, उमेश शिरसागर ,गणेश कदम, अर्जुन पलंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


या  संदर्भात नगरसेवक सचिन रोचकरी यांनी सांगितले की,  जिल्हाधिकारी  यांनी प्रत्यक्ष या परिसराची पाहणी केली आहे. आम्ही या पायऱ्यामुळे होणारे धोके आणि रस्त्यामध्ये झालेला अडथळा त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. लवकरच या संदर्भात निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. यानंतरही आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने तुळजापूर विकास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
 
Top