आध्यात्मिक महत्त्व असणारे भारतीबुवाचा मठ विकासापासून वंचित



तुळजापूर दि २१ डॉ. सतीश महामुनी

श्री  तुळजाभवानी देवीजीच्या शिवाजी दरवाजामधून पश्चिम दिशेला पाहिल्यास दुरवर दिसणारा भारती बुवांचा मठ प्रदीर्घ काळापासून भाविक भक्तांचा श्रद्धेचा विषय आहे. मात्र या मठाच्या विकासाकडे आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळे या परिसराचा विकास खुंटला आहे.

तुळजाभवानी देवी भारती बुवाच्या मठामध्ये रात्रीच्या काळात सोंगट्या खेळण्यासाठी जाते आणि पहाटे तिला अभिषेक महापूजेसाठी बोलावल्या नंतर ती मंदिरात येते अशी अख्यायिका आहे.  ही परंपरा आजही सुरू आहे, ज्या भारती बुवाच्या मठामध्ये तुळजाभवानी देवी जाते तिथे तिचे वास्तव्य आहे ,अशा पवित्र मठाच्या विकासासाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश न करता, त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

तुळजापूर शहराच्या बाहेर जाणारा चार पदरी हायवे महामार्ग भारती बुवांच्या मठपासून गेल्यामुळे या मठाच्या परिसराला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे . पूर्वी तेथे घनदाट वृक्ष असल्यामुळे निसर्ग सौंदर्य आणि डोंगर पायथा होता.  तसेच आराधवाडी या शहरातील वस्तीमध्ये हा मठ आहे .तरीही त्याचे सौंदर्य वाढवणे आणि त्या परिसराचा विकास करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे . त्याच्या शेजारी मोठ्या आकाराचे वाहनतळ उभारले आहे मात्र मठाचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. येथे येणाऱ्या भाविक भक्तांचे हे श्रद्धेचे स्थान असल्यामुळे क्षेत्र विकास आराखडा मध्ये याचा समावेश करून आवश्यक विकास कामे पूर्ण करावीत अशी भाविकांची मागणी आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे चौकशी केली असता क्षेत्र विकास आराखड्यात त्याचा समावेश असल्याचे समजले.
 
Top