नळदुर्ग, दि . 11
शुक्रवारी रात्री धुव्वाधार मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पुरासारखी परस्थिती निर्माण झाली होती . दरम्यान सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील मुर्टापाटीच्या (ता.तुळजापूर) पुढे मोरे पुलावरून कार वाहुन गेल्याची घटना दि . 9 जुलै रोजी रात्रीच्यावेळी घडली. सुदैवाने यादुर्घटनेत जिवीत हानी झाली नाही.
पुण्याहून नळदुर्ग मार्गे कर्नाटकातील गुलबर्गाकडे जाणा-या कार चालकास पुलावरून वाहणा-या पाण्याचा अंदाज न आल्याने कार पुरात वाहून गेली. कार पाण्यावर तरंगत पुढे पुलावरुन कोसळून एका खड्डयात पडली. मात्र यावेळी कारमधील सर्व 8 जण बालंबाल बचावले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदीस पूर आला होता. याठिकाणी असलेल्या पुलाचे बांधकाम करताना दोन्ही बाजूला मोठा उतार केल्यामुळे पुलाचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे पाण्याचा निचरा दोन्ही बाजूने व्यवस्थित होत नाही. या पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूला तब्बल सात ते आठ फूट पाणी वाहते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोळंबा होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी मारुती वॅगन कार क्र. (एम. एच. 12 क्यु. एम. 3706) ही रात्री 9 वाजेच्या सुमारास नळदुर्ग - जळकोट दरम्यान जळकोटपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर असलेल्या मोरे पुलावर आली असता चालकास पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पलीकडे जाण्यासाठी कार पाण्यात घातली. मात्र पाण्यात गेल्याने चाकातील हवेमुळे एका बाजूकडून उलट दिशेने सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून 30 फूट खोल पुलात जाऊन कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कार चालकास पाण्याचा अंदाज न आल्यामुळ पाण्यातूनच प्रयत्न केला. तत्पूर्वी चालक बाबू शेख यांनी सतर्कता दाखवत तत्काळ कारमधून उतरुन पुलाच्या कठड्यावर गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पाण्याचा प्रवाहामुळे गाडी सरकत होती. गाडीमध्ये चालकाची पत्नी व सहा मुली असे एकुण आठ जण होते. त्यामुळे शेख यांनी हार न मानता तत्काळ सीट बेल्ट बाहेर खेचून दगडी खुंटीला बांधले. त्यामुळे कार मधील पत्नीस व मुलींना बाहेर पडण्यास सांगितले.
यावेळी अन्य वाहन चालकांनी तत्काळ संबंधित महिलेसह व मुलींना बाहेर काढण्यास मदत केली. सर्वजण बाहेर पडताच ज्या दगडी खुंटीला सीट बेल्टने गाडी बांधली होती दुर्देवाने ती खुंटीही तुटून पाण्यात वाहून गेल्याने गाडीही तब्बल 30 फूट खोल पुलात कोसळली. सदर कार मधील कुटूंब मुळ गुलबर्गा येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या बकरी ईद सणासाठी सर्वांना कपडे खरेदी करून गुलबर्गाकडे निघाले होते. मात्र दुर्देवाने वाटेतच दुर्घटना घडली.
या वाहनामध्ये चालक बाबू मदारसाब शेख वय 42 वर्ष , शकिरा बाबू शेख वय 37 , सर्व मुली सादिया वय 17 , तबस्सूम वय 10 , बुशरा वय 12 , आलीया वय 8 , फातिमा वय 6, दोन महिन्याची तान्हुली दिलशाद यांचा समावेश होता.