तुळजापूर दि ८ : डॉ. सतीश महामुनी
हवामान खात्याने पावसाचा अंदाज घेऊन देखील तुळजापूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तुळजापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला अपेक्षा असताना अद्याप पाऊस सुरू न झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे . दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवण्यात येत आहे
तुळजापूर नळदुर्ग, सिंदफळ, माळुंब्रा, मसला खुर्द, काटी, सावरगाव, तांमलवाडी , काटगाव, मंगरूळ, पिंपळा खुर्द , तसेच सलगरा दिवटी, काक्रंबा, होनाळा, बारूळ, तीर्थ बुद्रुक, देवसिंगा, जळकोट, हिप्परगा रवा या परिसरात सध्या पावसाने दडी मारली आहे मागील महिनाभरापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड झाली आहे. परंतु म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तुळजापूर तालुका प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या संदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान नळदुर्ग शहर व परिसरात गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजता जोरदार पावसाने झोडपून काढले आहे.