नळदुर्ग , दि . ५
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत ग्रामीण भागातला विद्यार्थी टिकला पाहिजे आणि त्याच बरोबर ग्रामीण भागातील टॅलेन्ट हे पुढे आले पाहिजे म्हणून तुळजापूरचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांनी शैक्षणिक चळवळ उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७ पासून सुरु केली आहे.
व्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उम्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथून या चळवळीला सुरुवात केली आहे.
"प्रशासक बनो" ही संकल्पना घेऊन चंद्रकांत शिंदे यांनी हे विधायक उपक्रम सुरू केले आहे. भारत देश हा कृषिप्रधान अर्थात शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. अन्नदाता असलेल्या या शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत आली पाहिजेत म्हणून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणाची निर्मिती आणि अभ्यासिका ठिकठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत, हा उदात्त हेतू घेऊन नेहमीच चंद्रकांत शिंदे कार्य करीत असतात. याच अनुषंगाने त्यांनी आज नळदुर्गला भेट देऊन सविस्तर चर्चा केली.
चंद्रकांत शिंदे यांची ही सुंदर संकल्पना नळदुर्ग मध्ये सत्यात उतरवण्यासाठी व्यंकटेश नगर मधील ऋणानुबंध परिवारातील सर्व महिलांनी पुढाकार घेतला व ही जबाबदारी स्वीकारली. या ग्रंथालय अभ्यासिकेचा फायदा परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांसह नळदुर्ग महाविद्यालय व परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे. नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला समिती नेमली गेली.
या समितीतील माधवी जवळगे, शैलजा भस्मे, स्मिता अरबळे, गायत्री धरणे, प्रतिभा पवार या काही महिला प्रतिनिधीसहीत शरणप्पा पतगे, सिध्देश्वर मुरमे, शिवाजीराव माने, शिवाप्पा जवळगे,आनंद काटकर, परमेश्वर धरणे, धोंडीराम कदम, संतोष पवार, राहूल जाधव, अकाश भोसले, राहूल बनसोडे आदि उपस्थित होते.