उस्मानाबाद, दि.26 -
उस्मानाबाद शहरालत शेकापूर येथील बालाजीनगर भागात मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे बांधकाम कार्यारंभ आदेश मिळूनही रखडले आहे. हे बांधकाम 10 दिवसात सुरु करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  बालाजीनगर, शेकापूर येथे सन 2017 साली ग्रामस्थांच्या मागणीनुसार उस्मानाबाद जिल्हा परिषद मार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत उभारण्यासाठी ग्रामपंचायत मालकीचा ओपन स्पेस आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांना खरेदीखताने ताब्यात दिलेला आहे. त्यावर शासनाने ई-निविदा रक्कम रु. 87,53,033/- ही निविदा काढली असता मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन मु.पो. माळंब्रा ता. तुळजापूर यांनी हे काम घेतले. परंतु आजपर्यंत या कामाची सुरुवात किंवा बांधकामाची सुरुवात प्रत्यक्षात करण्यात आलेली नाही.

या कामामाध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे. हे बांधकाम कार्यारंभ आदेशाप्रमाणे दि. 29/10/2020 रोजी सुरु झाले असते तर गेल्या 2-3 महिन्यात हे आरोग्य केंद्र कार्यान्वित होऊ शकले असते.  त्याचा लाभ येथील नागरिकांना कोव्हीड-19 या महामारीमध्ये उपचारासाठी झाला असता. या भागातील कोव्हीड-19 च्या महामारीमुळे अंदाजे 20 लोकांचा मृत्यू झालेला आहे. हे आरोग्य उपकेंद्र सुरु झाले असते तर कदाचित यातील काही व्यक्ती वाचू शकले असते. 

कारण लोकांची उपचारादरम्यान दवाखान्यातील गर्दी पाहून अनेक रुग्णांनी घाबरुन उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे ते मृत्युमुखी पडलेले आहेत. आरोग्य उपकेंद्र सुरु झाले असते तर कदाचित हे रुग्ण घाबरले नसते. त्यांनी योग्य उपचार घेतला असता व त्यामुळे ते जगूही शकले असते. या कामामध्ये प्रशासनाने केलेला हजगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. 

दहा दिवसात या उपकेंद्र इमारत बांधकामाला सुरुवात करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षीरसागर यांची स्वाक्षरी आहे.

 
Top