मुरुम, दि . ११  : 

उमरगा तालुक्यात एक आगळा - वेगळा पुर्नविवाह पाहायला मिळाला. आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या लेकरांना या पुर्नविवाहाने मायेची सावली अन् वडीलांचे छत्र मिळाले तर एकमेकांना नवे जीवनसाथी. तालुक्यातील मुळज येथील रविकांत विलास सोनकांबळे व दाबका येथील अयोध्या धनराज कांबळे या दोघांचा पुर्नविवाह शनिवारी  दि.१० रोजी घडून आला. 


रविकांत यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यात त्यांना दोन मुली व एक मुलगा असे अपत्य झाले. सुखी चालत असलेला संसारात पत्नीला कर्करोग झाला व त्यात दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. यामुळे लेकरावरील मायेचे छत्र हरवले. तर अयोध्या यांचा नवरा व्यसनाच्या आहारी जाऊन घरातून पळून गेला. एक लहान मुलगी आहे. नवरा पळून जाण्याने मुलीवरील बापाचे छत्र हरवले. विशेष म्हणजे रविकांत व अयोध्या यांच्या दोघांच्याही वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे भवितव्य अंधारात होते. रविकांत-अयोध्या यांच्या पुर्नविवाह करण्याच्या विचाराने हा योग जुळून आला.  


हा विवाह उमरगा शहरातील बहुजन हिताय वसतिगृह येथे बौद्ध पध्दतीने संपन्न झाला. धम्मचारी प्रज्ञाजित यांच्या हस्ते हा विवाह लावण्यात आला.  हा प्रकाशरुपी परिणय घडवून आणण्यासाठी दाबका येथील प्रा.संजीव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद कांबळे, प्रा.उत्तम कांबळे यानी समुपदेशन करुन व विचार पटवून प्रयत्न केले.   या विवाहप्रसंगी अनेक अनिष्ठ रुढीपरंपराना मूठमाती देणारे आणि नवे रचनात्मक पांयडे पाडणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.किरण सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सगर सरांनी अशा प्रकारच्या विवाहांची गरज असल्याचे सांगून नवदाम्पंत्यास वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या. 


यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यानी मनोगत व्यक्त केले. महिला प्रमुख अश्विनीताई कांबळे, महिला संघटक रंजनाताई सुरवसे, धम्मचारी ज्ञानस्वर, धम्मचारी आर्यघोष, धम्मचारी शाक्यदिप तसेच वधू-वरांच्या आई सोजराबाई-काशीबाई यांची उपस्थिती होती. 

उपस्थितांनी त्यांचा पुढील संसारीक वाटचालीसाठी पुष्पवृष्टीसह मंगलकामना करीत शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कमी संख्येत, कोविड नियमानुसार अतिशय कमी खर्चात हा मंगल परिणय संपन्न झाला.
 
Top