उमरगा , दि . ७
कडदोरा ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आईसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एनसीईआरटी च्यावतीने 2018 चा राष्ट्रीय आईसीटी पुरस्कार देशातील 25 शिक्षकांना जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील तीन शिक्षाकांची निवड झाली असुन मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यायातुन एकमेव शिक्षक म्हणून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे.
त्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, एससीईआरटी पुणे येथील आयटी विभागाचे संचालक विकास गरड, आयटी सेल प्रमुख अभिनव भोसले यांनी सत्कार केला.
यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून तंत्रस्नेही चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन केले. तसेच शंभर टक्के मुलांचे शिक्षण कोरोना काळातही सुरू राहावे यासाठी प्रयत्न करावे. यावेळी खोसे यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण शिक्षणमंत्र्यासमोर केले.
ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाईलला रेंज नव्हती आशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे , मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी 51 ऑफलाईन अँप्सची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीच पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. तसेच ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवट्यातून त्यांच्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत. टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. तसेच कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन 365 दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अँप तसेच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत.
आशा काळात त्यांनी शाळेची स्वतः ची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे ऑनलाईन निकाल लावला आहे. ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे.
आयएसओ, उपक्रमशील, ॲक्टिव्ह स्कुल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे.