शालेय पोषण आहारामध्ये प्लास्टिकच्या तांदुळाची तक्रार खोटी - तुळजापूर गटशिक्षण कार्यालयाचे स्पष्टीकरण
पालकांनी दिलेली तक्रार घेतली मागे
तुळजापूर दि .१९ डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय पोषण आहारा मधून प्लास्टिक तांदूळ दिला जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तुळजापूर गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने काटगाव ता . तुळजापूर येथील प्रशालेत तांदळाची ग्रामस्थांच्या समक्ष चौकशी करण्यात आली.
यामध्ये सदर तांदूळ शासनाच्या निर्देशाप्रमाणे उपलब्ध असल्याची बाब निदर्शनास आली आहे, त्यामुळे तांदळाच्या दर्जाबाबत करण्यात आलेली तक्रार खोटी सिद्ध झाली आहे.
यासंदर्भात तुळजापूर गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये देण्यात येणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकच्या तांदळाचा समावेशक आहे , याची पडताळणी गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने काटगाव येथे करण्यात आली.
विस्ताराधिकारी एम .ई.माने, विस्ताराधिकारी वाले, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष महाजन , ग्रामसेवक झाडे आणि मुख्याध्यापक डी .आर. सपकाळे यांनी काटगाव येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत तांदळाचे नमुने घेऊन ग्रामस्थ या संदर्भात नमुना घेतलेल्या तांदळापासून भात तयार करण्यात आला, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी या तांदळाची चव पाहिल्यानंतर सदर तांदूळ चांगला असून त्यामध्ये प्लास्टिक तांदूळ नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित झालेले वृत्त निराधार असल्याचा खुलासा गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने सोमवार दि . १९ जुलै रोजी सायंकाळी लेखी पत्राद्वारे करण्यात आला.
यासंदर्भात काटगाव ता. तुळजापूर येथील पालकांनी तक्रार दिली होती. गटशिक्षण कार्यालयाकडून नमुने तपासणी केल्यानंतर तक्रार करणा-यानी त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.