वागदरी, दि .९ : एस.के.गायकवाड
मृग नक्षत्राने थोडी फार हजेरी लावल्याने तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग, वागदरीसह परीसरातील सर्व शेतकऱ्यानी खरीप हंगामातील पिकांची पेरणी लगबगीने केली.बहुतांश शेतकऱ्यानी खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची निवड केल्याने परिसरातील जबळपास ८० टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाल्याचे समजते.
शासनाच्या महाबिज कंपनीच्या सोयाबीन बियाणाचा सुरुवातीपासून तुटवडा झाल्यानंतरही इतर कंपनीच्या सोयाबीनचे महागडे बियाणे घेऊन एकदाची पेरणी पूर्ण झाली. पिक उगवूण आले.काळी आई हिरवा शालू नेसल्यागत वाटू लागली.येता जात बळी राजाच्या नजरा पिकावर फिरवू लागल्या.अंतर्गत मशागत करण्यासाठी तयारी सुरू केली. पण नंतरच्या नक्षत्राने चक्क दडी मारली आणि डौलाने डोलणऱ्या पिकानी माना टाकल्या. पिके दुपार धरु लागले अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरु झाली. तरीही नशिबावर भरवसा ठेवून शेतकरी अंतर्गत मशागत करून घेण्यात मग्न होता.
दोन दिवसा पूर्वी पुक नक्षत्राची सुरूवात झाली. गुरुवार दि.८जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पुक नक्षत्रातील पावसाच्या हालक्याशा सरीने सर्व दुर हजेरी लावली आणि पिकाना सलाईन मिळाल्यागत झाले. पिकाने माना वर केल्या आणि शेतकऱ्याच्या आशा ही पल्लवीत झाल्या.