परंडा , दि . ५ :
परंडा तालुक्यातील मौजे जाकेपिंपरी येथील शेतकरी अंकुश तुकाराम बारस्कर (५८) यांनी कर्ज मिळावे म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा परंडा येथे पिक कर्ज फाईल दाखल केली होती .बँकेत अनेक चकरा मारूनही संबंधित बँक मॅनेजरने बारस्कर यांचे फाईल मंजूर केले नसल्याचा आरोप करुन निराश झालेला शेतकरी अंकुश बारस्करयानी अत्महात्या केली आहे . याप्रकरणी सबंधित बँक मँनेजरवर शेतकऱ्यास अत्महात्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परंडा तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने शेतकरी वर्ग त्रस्त असून कर्जबाजारी आहेत . बारसकर यांच्यावरही खासगी सावकाराचे कर्ज होते. शेतामध्ये काही पिकत नसल्याने पिकलेच तर योग्य भाव मिळत नसल्याने कर्जाचा आकडा वाढत गेला. म्हणून बँकेकडून तरी पिक कर्ज मिळेल या अशाने त्यांनी भारतीय स्टेट
बँकेच्या परंडा शाखेत पिक कर्ज मिळावे म्हणून फाईल दाखल केली होती. मात्र बँक प्रशासनाने फाईल मंजूर केली नाही, या नैराश्यातून बारस्कर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली .
सदरील शेतकऱ्यास बँक प्रशासनाने वेळीच कर्ज दिले असते तर त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती .अशा या कामचुकार बँक मॅनेजरवर शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परंडा तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर घोगरे, अँड. हनुमंत घोगरे, सिद्धेश्वर भोजने, श्रीहरी सोनवणे, भालचंद्र आरेकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.
सदरील बँक मॅनेजर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .