ताज्या घडामोडी


तुळजापूर दि . ६ :

जिल्हा परिषद मधून पारंपारिक लोककलावंतांना देण्यात येणारे मानधन दरवर्षी केवळ १०० कलावंतांना दिले जाते ही संख्या वाढवून अर्ज केलेल्या सर्व कलावंतांना कलाकार पेन्शन मंजूर करावी अशी मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी केली आहे.

तुळजापूर येथे गोंधळी समाज संघटनेच्या वतीने निलंगा तालुक्यातील नणंद येथून निघालेल्या दंडवत यात्रेच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड गोंधळी, लातूर जिल्हा अध्यक्ष सौ पुष्पा ताई मेहेत्रे, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महिला सौ. मीराताई गायकवाड, लातूर जिल्हा सरचिटणीस तात्यासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या अगोदर येथून आलेल्या यात्रेचे स्वागत तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या समोर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड गोंधळी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले. 

पारंपारिक लोककलावंतांची खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपासमार झाली आहे याकडे सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ही दंडवत यात्रा पूर्ण केल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी सांगून दरम्यान राज्य सरकारने लोककलावंतांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे अभिनंदन करत आहोत असे याप्रसंगी सांगितले.

जिल्हा परिषदेमध्ये प्रस्ताव दिलेल्या सर्व लोककलावंतांना मंजूर झाली पाहिजेत यामध्ये वयाची अट देखील शिथिल करण्यात यावी. त्याच बरोबर निवड समितीमध्ये कलावंतांचा समावेश असला पाहिजे. राज्यकर्त्यांकडून लोककलावंतांची खूप मोठ्या प्रमाणावर उपेक्षा होते त्यामुळे आगामी काळात ही दंडवत यात्रा महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमधून लोककलावंतांच्या प्रश्नासाठी जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत पारंपारिक लोककला संवर्धन व संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे यामध्ये स्थानिक लोककलावंतांच्या लोककला आणि त्यांच्या विविध समस्या सोडविल्या जातील.

कोरोना आपत्तीमधील शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी आम्हा लोककलावंतांना सरकारने काम करायची संधी देणे गरजेचे होते ज्यामुळे लोककलेच्या माध्यमातून लोककलावंतांनी जनतेमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करून लोकांच्या मनातील भीती काढून टाकली असती हे न झाल्यामुळे निष्पाप लोक मरण पावले याला सरकार जबाबदार आहे अशा शब्दात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी सरकारवर टीका केली.
 
Top