तामलवाडी , दि . १६ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरास उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. पोलिसांसह विविध सामाजिक संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिबिरात 106 दात्यांनी रक्तदान केले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे. ही परिस्थिती ओळखून तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पोलीस पाटील संघटना, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त दात्यांनी शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून रक्तदान केले. दिवसभर रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत गेला.
जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. पंडित, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. घुले,एम. जी. बनसोडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचार्यांनी शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. शिबिरात दिवसभरात 106 दात्यांनी रक्तदान केले.
सपोनि पंडित यांच्या पुढाकाराने शिबिर यशस्वी
तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. पंडित हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक उपक्रमांना सतत प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे परिसरात पोलीस दलातील लोकप्रिय व्यक्तीमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे युवकांनी मोठा प्रतिसाद देत शिबिरात सहभाग नोंदवला. यापुढेही पोलीस ठाण्याच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम घेऊन त्यामध्ये लोकसहभाग वाढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.