काटी , दि .१: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अचानक छापा टाकून चोरीचे विद्युतपंप विकणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना अखेर जेरबंद करण्यात तामलवाडी पोलीसांना यश आले आहे.
या कार्यवाहीत तामलवाडी पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन पोलीसांच्या चौकशी दरम्यान 6 पाणबुडी मोटारी हस्तगत केल्या. त्याची अंदाजे किंमत 47 हजार असून चोरी करताना वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याची अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये आहे. असा एकूण 87 हजार रुपयेचा माल जप्त केला आहे. विद्युत मोटार चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक आर. बी. घुले व पथकातील पो कॉ शिवाजी सिरट, पो.कॉ.आकाश सुरनर यांना वडगाव (काटी) येथे तिघेजण चोरीचे पंप विक्री करत असल्याचे गोपनीय माहिती समजली होती. तेव्हा वडगाव (काटी) वस्तीवरील विजय भालचंद्र काळे, सागर माणिक पवार, देविदास रामा पवार जुन्या इलेक्ट्रीक पंपाची विक्री करत असल्याचे आढळून आले.
यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सहा इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार जप्त करण्यात आल्या.तामलवाडी पोलीस गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस निरीक्षक आर.बी. घुले, पो.कॉ.शिवाजी सिरसट, पो.कॉ. आकाश सुरनर यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे गुन्हेगारी क्षेत्र मोडकळीस आले असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून तामलवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे