सोलापूर , दि . २६:
महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटनावर मोठा भर दिला आहे. महाराष्ट्र पर्यावरण मंत्री ना आदित्य ठाकरे यांनी कृषी पर्यटनाला बळ देण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात एका शेतकरी महिलेने कृषी पर्यटन सुरू करण्याचा बहुमान शिवसेना नेत्या व मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिता गायकवाड यांनी पटकावला आहे.
मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे 40 एकर शेत जमिनीवर अस्मिता कृषी पर्यटनाचा भव्य प्रकल्प सन 2017 पासून उभारला जात आहे. यामध्ये आंबा, चिंच, पेरू, नारळ, लिंबू तसेच चिकू ,मोसंबी, जांभूळ ,सीताफळ आदींच्या बागा आहेत .
याशिवाय निवासी आणि अनिवासी पर्यटकांच्या सहली करिता भव्य मनोरंजन हॉल, मंगल कार्यालय, रेन डान्स, इंनङोअर गेम्स ,मैदानी खेळ, बोटिंग, बैलगाडी रपेट , ट्रॅक्टर रपेट, फेरी गार्डन, कृषी अवजारांचे प्रदर्शन ,भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन आणि स्वादिष्ट व चविष्ट भोजन , सुरक्षित निवासी व्यवस्था तसेच पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांच्या सहलीचा ही समावेश आहे. या प्रकल्पाची उभारणी पूर्णत्वाला आली असून लवकरच मान्यवरच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे .
यासाठी प्रकल्पाची नोंदणी आणि आवश्यक ते परवाने मिळाले आहेत दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालया विभागाच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया करमरकर यांनी या बाबतचे नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी पर्यटन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी विशेष पथकाद्वारे केली होती . प्रमाणपत्र अस्मिता कृषी पर्यटनाचे सी.ई.ओ. अॕङ. सुरेश गायकवाड यांनी पुणे येथील साखर संकुल येथे स्वीकारले आहे. यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचे कृषी पर्यटन विभाग प्रमुख बाळासाहेब सोळांकूर हे देखील उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातून एका महिला शेतकऱ्याने उभारलेला कृषी पर्यटनाचा हा एकमेव प्रकल्प आहे .यामुळे अस्मिता गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.