उस्मानाबाद दि.७ : 

परिचारिका व संवर्गातील महिलांची  बदनामी करणाऱ्या एका वृत्तपञाचे  संपादक व पत्रकारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन संघटनेच्यावतीने येथील परिचारिकांनी शनिवार  दि.७ ऑगस्ट रोजी आंदोलन केले. दरम्यान, संबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.३० जुलै रोजी बीड येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाच्या वृत्तपत्रात क्रॉसलाईन या सदराखाली परिचारिका या संवर्गावर चारित्र्यहनन करून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा प्रयत्न संपादक व पत्रकार या दोघांनी केल्याचा आरोप केला  आहे.  या वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या वृताच्या क्रॉसलाईनमध्ये  संपूर्ण परिचारिका या संवर्गाचे व संवर्गातील महिलांची बदनामी करून संपादकांनी या संवर्गावर वैयक्तिक द्वेष व राग काढलेला दिसून येत असल्याचा आरोप केला आहे. तर असे वृत्त छापून भारतीय राज्य घटनेने दिलेल्या लेखन स्वातंत्र्याचे उल्लंघन केले असून संपूर्ण संवर्गावर लांछनास्पद टीका करणे हा गुन्हाच आहे. 
त्याबरोबरच समाजामध्ये सामाजिक द्वेष पसरविण्याचा निंदनीय प्रकार देखील आहे. यामुळे परिचारिकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण झाल्यामुळे परिचारिकांची काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. तसेच त्या वृत्तपत्रात ७ वर्षांपूर्वी असाच विकृत लेख लिहिलेला होता असा उल्लेख केला करुन  अशा विकृत पत्रकारावर व वर्तमानपत्रावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व त्या वर्तमान पत्रातील त्या विकृत पत्रकारावर गुन्हा नोंद करावा व त्यांची पत्रकारिता रद्द करण्यात यावी. अन्यथा राज्यातील सर्व परिचारिका मार्फत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व त्याची दखल न घेतल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. 


या निवेदनावर अध्यक्ष नलिनी दलभंजन, उपाध्यक्ष संगीता चिरके, सचिव सुलभा भड,  खजिनदार प्रेमा निंबाळकर यांच्या सह्या आहेत.

 

 
Top