तुळजापूर दि १६
सर्व नागरिकांनी लस घ्यावी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आपण शंभर टक्के लस घेऊन सुरक्षित व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बोलताना केले.
तुळजापूर नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते शंतनू गंगणे, युवक नेते विनोद गंगणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक अमर मगर, नगरसेवक पंडित जगदाळे, नगरसेवक किशोर साठे, रणजित इंगळे, अविनाश गंगणे, अधीक्षक वैभव पाठक, नारायण गवळी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी बोलताना मागील अनेक महिन्यापासून कोरोना संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत, यामध्ये लसीकरण हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे सर्व नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने लसीकरण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे जे लोक अद्याप लस घेतले नसतील त्यांनी जाणीवपूर्वक लस घ्यावी, म्हणजे तुळजापूर शहर शंभर टक्के लस घेतलेले शहर होऊ शकेल,
याशिवाय तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद असल्यामुळे सर्व अर्थकारण अडचणीत सापडले आहे हे तुळजाभवानी देवीचे मंदिर तातडीने उघडावे अशी मागणी आपण राज्यशासनाकडे करीत आहोत असेही यावेळी त्यांनी सांगितले. नगरपरिषद शहरातील नागरिकांना लाईट पाणी आणि स्वच्छता या नागरी मूलभूत सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत असेही यावेळी नगराध्यक्ष रोचकरी म्हणाले. ७५ वा स्वातंत्र्यदिन निमित्ताने त्यांनी सर्व शहरवासीयांना नगरपरिषदेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात नगरसेवक पंडित जगदाळे, नगरसेवक अमर नगर ,प्रसिद्ध अभिनेते शंतनू गंगणे यांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र काबरे यांनी केले.