तुळजापूर , दि .२२ : राजगुरू साखरे
कधी नव्हे ते पहिल्यांदाच, यंदा दहा हजार प्रति क्विंटल सोयाबीन दर गेल्यामुळे बळीराजा एकदम खुशीत असतानाच सोमवार दि २० सप्टेंबर रोजी सोयाबीन दराची घसरण होऊन प्रतिक्विंटल पाच हजार पाचशे दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
तुळजापुर तालुक्यातील चिवरी, अणदुर,येवती, काळेगाव, आरळी, चिंचोली, तसेच नळदृर्ग मंडळ परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते, परिसरात प्रारंभी दमदार पाऊस पडल्याने पेरणी योग्य वेळेवर करण्यात आली होती, परंतु यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल एक महिना पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पिकाचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे त्यातच सोयाबीन काढणीच्या हंगामात दर दहा हजाराच्या घरात गेल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाढलेल्या मजुरीत, सोयाबीन काढणीस वेग आणला आहे,
मागील आठवड्यामध्ये सोशल मीडियावर सोयाबीन ला सोयाबीनला अकरा हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे असा संदेश फिरत होता , परंतु अचानक सोयाबीनचा भाव अडीच ते तीन हजार रुपये दराने कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हा संदेश शेतकऱ्यांना मृगजळासारखे ठरत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पिकांना कवडीमोल बाजार भाव या कोणत्यातरी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनच्या वाढलेल्या भावाची चर्चा होती, परंतु ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेस दर घसरल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.